नमस्कार करतो.... अरे नको नको

           जूनं ते सोनं पण ते का सोनं आहे ? त्यामागे काही रहस्य दडले आहे का ? 

मग ते जुनं काहिही असो एखादी वस्तू एखादी रुढी परंपरा

 किंवा एखादी सवय सूद्धा असू शकते आता त्यातील एक

 आपली संस्कृती आहे कि वडिल मंडळीच्या पाया पडणे त्यांना

 नमस्कार घालणे पण त्यातही आधुनिकीकरण दिसत आहे .

 म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि एखादा नमस्कारासाठी

 खाली वाकला कि तो वयाने लहान झाला आणि नमस्कार

 करून घेणारा मात्र अप्रत्यक्षपणे मोठा झाला आणि याचाच तर

 कमीपणा वाटतो का कि आजून काही .... आता स्वार्थी

 असलेल्या पिढीने हे जाणायला हवे कि नमस्कार केला कि

 समोरच्या व्यक्तीला आशिर्वाद द्यावा लागतो मग हा आशिर्वाद

 नको का आपल्याला.... आता यावरील एक प्रसंग पाहूया....


नमस्कार करतो -.... मी

नको नको की कल्याणमस्तु?


नमस्कार करतो  .....” 

अरे नको नको.....


आपल्या रोजच्या आयुष्यातला हा संवाद किती सहज, किती ओळखीचा. पण कधी थांबून आपण विचार केलाय का — “नको नको” म्हणताना आपण नेमकं काय नाकारतो आहोत?

आशिर्वादात खूप ताकद असते. आशिर्वादाचा मोती सर्वांनी जपला पाहिजे ....





 


नुकतेच माझ्या दोन पुतणींची लग्न झाली. नवीन नात्यांची उब अजून ताजीच होती. त्या दोघींना आणि माझ्या दोन जावयांना मी घरी जेवायला बोलावलं.

जेवण, गप्पा, हशा सगळं छान पार पडलं.

निघताना त्यांनी चौघांनी वाकून नमस्कार केला.

क्षणभर माझ्या मनात आलं —

“अरे नको नको… पाया काय पडता… मी काही एवढी मोठी नाही…”

पण… मी काहीच बोलले नाही.

का?


कारण माझ्या मनात एक छोटासा, पण खूप खोल प्रश्न आधीपासूनच जिवंत आहे.

एकदा माझा मुलगा दोन-तीन वर्षाचा असताना मला म्हणाला -  “आई, तू म्हणतेस म्हणून मी सगळ्यांना नमस्कार करतो. पण सगळे ‘नको नको’ म्हणतात. नको नको हा काय आशीर्वाद झाला का? मग काय फायदा?”

त्या क्षणी मी थबकले.

मग त्याला इतकंच सांगितलं - “पुढच्या वेळी नमस्कार करण्याआधी सांग — ‘ नको म्हणू नका....आशिर्वाद द्या .’ ”

आज तो कधी कधी तसं सांगतोही… आणि समोरच्यालाही हसू येतं, आणि नकळत आशीर्वादही मिळतो.


माझी आजी म्हणायची - “शत्रूलाही नमस्कार करावा. कारण नमस्कार केला की समोरच्याला आशीर्वादच द्यावा लागतो. अपशब्द दिला तर तो त्यालाच लागतो.”

तेव्हा कदाचित पूर्ण कळत नव्हतं… पण आज जाणवतं — आपल्या संस्कृतीत “नमस्कार करणं” किंवा “पाया पडणं” ही फक्त औपचारिक गोष्ट नसते, ती आदर, आपलेपणा आणि नात्याची कबुली असते.


पूर्वी सरसकट शिकवले जायचे — “मोठ्यांच्या पाया पडायचे”.

आता काही जण म्हणतात — “पाया पडावे अशी माणसं उरलीच नाहीत.”

पण खरं उत्तर या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे.

नमस्कार हा व्यक्तीला नसून गुणांना असतो

माणूस म्हंटलं की तो चुका करणार, म्हणून तो सरसकट वाईट होत नही. 

खरं तर नमस्कार हा त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांना, कौशल्याला, साधनेला असतो.

एखाद्या लेखकाला नमस्कार करताना — आपण त्याच्या लेखनकौशल्याला वंदन करतो

एखाद्या शिक्षकाला नमस्कार करताना — त्याच्या ज्ञानदानाच्या वृत्तीला मान देतो

एखाद्या वडीलधाऱ्याला नमस्कार करताना — त्यांच्या अनुभवाला आणि जीवनशहाणपणाला आदर देतो

ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात आदरणीय असेलच असेही नही . 


काही दिवसांपूर्वी माझे मामे सासरे घरी आले होते. त्यांचा ठाम नियम — “माझ्याजागी देवाच्या पाया पडा.”

त्यांचं म्हणणंही योग्यच.

पण माझं थोडंसं वेगळं म्हणणे आहे.

देवाला नमस्कार — तो रोजचा, मनापासून.

पण माणसातल्या देवाला नमस्कार — तोही तितकाच आवश्यक.

कारण देवाचे आशीर्वाद आपल्यामागे असणे गरजेचेच. पण ते  ऐकू येत नाहीत, मोठ्यांचे ऐकू येत असलेले आशीर्वाद —

“सुखी रहा”, “आनंदी रहा”, “यशस्वी हो”…

हे शब्द कानावर पडतात, मनात मुरतात.

नमस्कार म्हणजे फक्त वाकणं नाही, तर समोरच्याच्या मनातलं चांगुलपण जागं करणं आहे.

अणि आपणच म्हणतो ना, "कर्ता करविता 'तो', आपण निमित्त मात्र". मग देवाचेच आशिर्वाद तुमच्या माध्यामातून त्या पाया पडलेल्या व्यक्तीला मिळातात असा माझा ठाम विश्वास आहे.


माझी आई नेहमी म्हणते -

“कल्याणमस्तु हा परिपूर्ण आशीर्वाद.”

त्या एका शब्दात सगळं आहे —

सुख, समृद्धी, यश, आनंद, आरोग्य, दीर्घायुष्य…

एकच शब्द, 

पण संपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा.


आजची पिढी मात्र थोडी गोंधळलेली आहे. नमस्कार करणं म्हणजे कमीपणा असं त्यांना वाटतं.

पण खरं तर..

तो अहंकार सोडण्याचा क्षण आहे.

अनुभवाला दिलेला मान आहे. 

आणि एक प्रकारे समोरच्यावर टाकलेली सकारात्मक जबाबदारी आहे.


माझा मुलगा एकदा म्हणाला, “मी सगळ्या मोठ्यांना नमस्कार करतो, तू अणि बाबा पण सगळ्यां मोठ्यांना नमस्कार करता, पण त्यांच्या घरातली लहान तुमच्या पाया का नाही पडत?”

मी त्याला समजावले, “दुसरे काय करतात तो आपला प्रश्न नाही. तू काय करतोस ते महत्त्वाचं. त्यांनी काय करावं हे त्यांच्या घरचे ठरवतील.”


संस्कार हे तुलना करून नाही, तर जाणीवपूर्वक जगून दिले जातात.


आज अनेक गोष्टी “नाटकी” वाटतात. कारण त्या दुर्मिळ झाल्या आहेत. मोदी जी जेव्हा मोठ्यांच्या पाया पडतात तेव्हा बघणार्‍याला तो नाटकी पणा वाटतो, कारण त्यांनी स्वतः ते सगळे सोडून दिले आहे. स्वतः सोडले तिथे त्यांच्या घरातल्या लहान मुलांना ते कसे माहीत असणार?


उद्या माझा मुलगा सुद्धा मोठा झाल्यावर मोठ्यांच्या पाया पडेल आणि कुणाला तो नाटकी वाटेल…

तर मला चालेल.

कारण मला माहित आहे — तो अभिनय नाही,

तो त्याच्या मनातला संस्कार आहे.


आपण अनेक गोष्टी सोडल्या…

कधी सोयीसाठी, कधी “modern” दिसण्यासाठी.

आणि मग आपणच म्हणतो — “संस्कृती टिकली पाहिजे.”

संस्कृती मोठ्या घोषणांनी, किंवा टिकली लावल्याने नाही टिकत, ती टिकते रोजच्या छोट्या कृतींनी.

म्हणून आता एक छोटासा बदल करूया?

पुढच्या वेळी कुणी नमस्कार केला, पाया पडलं तर —

“नको नको” म्हणण्याऐवजी


क्षणभर थांबूया…

आणि मनापासून म्हणूया - 

सुखी रहा..... कल्याणमस्तु.....” ✋️✨️

कदाचित तिथूनच पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचा धागा जोडला जाईल.


मग काय वडील मंडळींचे घेताय ना आशिर्वाद😊💓 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे आरोग्य माझ्या हाती

होय खरचं आहे हे ...🤔 पण नेमकं काय